*सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा*
*अनुभव कथन.*✍️
१९८० च्या दशकात ग्राम विकास शिक्षण संस्था संचलित, विवेकानंद हायस्कूल पढावद ही शाळा सुरू झाली. शहापूर, तांदळी आणि भिलाली या गावांनाही या शैक्षणिक संस्थेचा ज्ञानार्जणासाठी फायदा झाला. या संस्थेने आज तागायत २०० हून अधिक शिक्षक, सैनिक, पोलीस डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी आणि संशोधन क्षेत्रातही आपला नावलौकिक मिळवलेला आहे. संस्थेच्या स्थापनेपासून शिक्षकांनी अतिशय मेहनतीने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांवर लक्ष दिले आहे. मोजक्याच फीवर शिकवणी घेऊन, विद्यार्थ्यांची पायाभरणी केली. एवढेच नव्हे तर दहावीच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी हे शिक्षक रात्रंदिवस खडा पहारा देत होते. रात्री प्रत्येकाच्या धाब्यावर जाऊन झोपड्यांमध्ये निरीक्षकाचे काम करत होते. तेव्हा त्यांचा चांगला वचकही होता. शिक्षक केव्हा फेरी मारतील याचा नेम नसतं. जर आपण झोपलेलो राहिलो तर आपली काही खैर नाही म्हणून नाविलाजाने का असेना आम्ही बारा-एक वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. गणित समजून सांगणे आणि गणितासारखा विषय सोपा करून सांगण्याची हातोटी श्री. एस. बी. पवार सर यांच्याकडे होती. जेव्हा गणित शिकताना सर्वांचा मूड जायचं अशावेळी रामायण- महाभारताच्या सुंदर अशा गोष्टी श्री. एस. बी. पवार सर सांगायचे. यावरूनच त्यांनी आमची गणितासोबतच धार्मिक-सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणही केलेली आहे. भीष्माची व अर्जुनाची उदाहरणे देऊन ते आम्हाला प्रोत्साहित करायचे आणि हो जर फड्याकडे दुर्लक्ष केलं, गप्पा मारल्या तर मात्र त्यांच्या खडूचा नेम कधीही चुकत नसतं. शिक्षा आणि शिक्षण यांचा संमिश्र ज्ञानप्रवाह पवार सर यांनी दिलेला आहे. म्हणून गणित आणि श्रीराम सर हे जीवनातलं अविस्मरणीय सूत्र आहे.
---------***---------
गणित आणि इंग्रजी म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. मुळात या दोनच विषयांमध्ये मुलं दहावी नापास व्हायचे. मित्रहो त्यावेळी दहावी नापास झालेल्या ९९% विद्यार्थ्यांना शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागला आहे. नापास झाला की, तो पुढे शिक्षणाच्या लायकीचा नाही, असा जणू त्याच्यावर शिक्काच मारला जायचा. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य हे रसातळाला गेलेले आहे. म्हणून पहिल्याच फेरीत पास होण्यासाठी खूप धडपड चालायची. या धडपडीत श्री. एस. ए. गुजर सर यांचे खूप मोठे योगदान होते. नानासाहेबांचे गणित आणि इंग्रजीवर मोठे प्रभुत्व होते. गणिताच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी आम्हाला शिकवलेल्या आहेत. कधीकधी, खरंतर हे ज्ञानग्रहण करण्यासाठी आम्हीच अपूर्ण पडलो असं वाटतं. या जगामध्ये दोनच व्यक्ती यशस्वी होतात. एक हूशार आणि दुसरा म्हणजे प्रचंड मेहनती. कारण या जगात हुशार आणि मेहनतीला कोणीही हरवू शकत नाही. परीक्षेच्या वेळी नानासाहेब रात्री एका हातात बॅटरी आणि एका हातात स्टंप घेऊन यायचे. झोपलेला सापडल्यावर आम्हाला स्टम्पचा धाक दाखवून आमच्याकडून अभ्यास करून घेत होते. आम्हाला तेव्हा वाटायचं कशाला रात्री त्रास देतात? परंतु पेरणीच्या वेळेस कळत नाही कोणतं पिक चांगलं येणार? आमचा त्यावेळी समज कमी होता असचं म्हणावं लागेल. त्यांनी अविरतपणे त्यांचे हे काम सुरूच ठेवले. वेळ प्रसंगी शिकवणीची फी नसायची. नानांनी फीसाठी कधीही अडवलं नाही. शिक्षणाची मुक्तद्वारे म्हणतात ती हिच. या दोघांच्या शिकवण्या म्हणजे जणू काही मुक्त विद्यापीठ होतं. या शिका आणि मोठे व्हा! जणू हे ब्रीदवाक्य त्यांनी आपल्या ध्येयापाशी बांधले होते. एक प्रेरकशक्ती नानासाहेब यांच्या शिकवण्यातून नेहमी जाणवत होती. मला तर नवलचं वाटतं की, या शिक्षकांनी ग्रामीण भागात राहून मनोभावे शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. शहराचा हव्यास त्यांच्या मनी कधीही आम्हाला जाणवला नाही. समाधानी वृत्ती ठेवून ग्रामीण भागातला युवक पुढे जावा ही, त्यांची दृष्टी होती. त्यावेळी ही मंडळी शहरांमध्ये व्यवस्थितपणे स्थिर होऊ शकली असती. परंतु आपल्या सोबत आपल्या गावातील बांधव पुढे जावे ही, त्यांची वृत्ती आजही जशीच्या तशी आहे. म्हणूनच आजही ते जनतेच्या मनातले आदर्श शिक्षक पुरस्कर्ते आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील आदर्श शिक्षक म्हणून यांचे स्थान नेहमीच अग्रस्थानी असेल.
-------***-----------
श्री. आर. एस. पवार सर यांचा खूप कमी सानिध्य मला लाभलेला आहे. आबासाहेब हे सर्वसाधारण एक सामाजिक आणि धार्मिक प्रवृत्तीला धरून असणार व्यक्तीमत्व आहे. माणसातल्या माणूसपणाला जपणारं आहे. नेहमी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येणारे शिक्षक म्हणूनच पुढे आलेले आहेत. आबांनी वेळ पडली तर विद्यार्थ्यांची फी सुद्धा भरलेली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या मनात मोठा आदरभाव मी स्वतः पाहिलेला आहे. त्या मुलांचा इंजिनिअरिंगला वगैरे कुठेतरी नंबर लागावा म्हणून त्यांची कायम धडपड असते. आदिवासी प्रवाह सामाजिक प्रवाहात सामील व्हावा हा त्यांचा नेहमी अट्टाहास राहिलेला आहे. आबासाहेबांना शेवटची दोन वर्ष मुख्याध्यापक पद मिळाले. त्यांनी त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून मुख्याध्यापक पदाचा लवलेशही जाणवू दिला नाही. एक सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणून ते जगले. यावर त्यांनी मला बऱ्याचदा सांगितले की, मी नवनवीन काय करू शकतो?आणि किती कराव असं मला वाटतं. परंतु वेळ खूप कमी आहे. माझ्याकडे पदाचा कालावधी कमी असल्यामुळे माझ्याकडून ही मोठी मोठी काम होतील का? आणि ती कशी करावी लागतील त्याचे नियोजन चे सतत करत असायचे.
श्री. सिताराम भाऊ हेही आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनीही त्यांचे काम इमानदारीने पूर्ण केलेले आहे. म्हणून आज शेवटी असं म्हणावसं वाटतं की, मराठीचे श्री.बी. एस.पाटील सर हिंदीच्या श्रीमती.शशिकला मॅडम, इतिहासाचे खडगावचे सर, विज्ञानाचे गोडसर या सर्वांनी मिळून पढावद व पढावद परिसरातील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक आयाम दिलेला आहे. आज ती संपूर्ण पिढी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहे. आयुष्याच्या एका मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक सेवेचा आज कार्यालयीन शेवटचा दिवस ते अनुभवत आहेत. उद्याचा उगवणारा सूर्य हा त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या पर्वाचा असेल. ज्या पर्वामध्ये कौटुंबिक स्नेह, सामाजिक आपुलकी, सामाजिक सेवा अशा जबाबदाऱ्या असतात. खरंतर, शिक्षक हा
कधीही सेवानिवृत्त होत नाही व होऊ नये असं मला वाटतं. कारण ज्ञानगंगा कधीही आटत नाही. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर डॉ. कलाम हे प्राध्यापक पदावरून कधीही सेवानिवृत्त झाले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ज्ञानार्जणाचे काम केले. दैवयोगाने आपल्याकडे खूप मोठी सरस्वतीची देण आहे. आपण आपल्या परिसराला कायम ती देऊन, स्वतःला गुंतवून, मानसिक, शारीरिक स्वास्थ्य नव्याने ऊर्जित करून ज्ञानार्जनाचा प्रवाह असाच प्रवाहित ठेवून ज्ञानार्जन करावं असं मला वाटतं. त्यातूनच आरोग्य संपन्न व्हावं ह्याच शुभेच्छा. 💐💐💐🙏🌹🌹🌹
-डॉ.संजय पवार,
मंत्रालय, मुंबई
No comments:
Post a Comment